Saturday, September 22, 2007

सर

रोज कामावरून परत येताना हायवेवरची रहदारी बघून कामाचा क्षीण अजूनच वाढतो. एखाद्या कार्टूनफिल्ममधल्यासारखी माझी गाडी कुणीतरी हातानी चक्क ऊचलून घराच्या गॅरेजमध्ये नेऊन ठेवावी अशीदेखील ईच्छा होते. पण हा सगळा थकवा एका वळणावरमात्र मी विसरून जाते. माझ्या नावडत्या हायवेवरचं हे वळण मात्र माझं लाडकं! ह्या वळणावर दोन डोंगर जणू हस्तांदोलनच करतात. आणि त्यांच्या कुशित हा पाच लेन असलेला हायवे गायबच होऊन जातो, त्याच्यावर धावणा-या सर्व गाड्यांसकट! हे दोन डोंगर आणि मागून डोकावणा-या दोन ईमारती माझं घर जवळ आल्याची खूण दाखवतात.

उन्हाळा संपत आला होता. हा आणि मी त्याच वळणावर होतो. मी ह्याला म्हणाले, ’बस...आता एक पाऊस पडून गेला की आणखीनच सुंदर दिसणार हे डोंगर’. माझ्या बोलण्यावर हा हसला आणि म्हणाला, ’अगं LA मध्ये पाऊस अगदीच क्वचित पडतो. त्यामुळे विशेष आपेक्षा ठेऊ नकोस.’ मी जरा हिरमुसले आणि पाऊस पडणारच नाही अशी स्वतःचीच समजुत घातली.

आज रात्रपाळी करायची होती म्हणून दुपारी तास दोन तास आडवी झाले होते. बाहेर आभाळ भरून आलं होतं. ’LA मध्ये पाऊस नाही ’ हे मनाला ठणकाऊन सांगितलं असल्याने आभाळात दाटून आलेल्या त्या ढगांची मी खबरसुध्दा नाही घेतली. झोप नीट का नाही लागली अशी स्वतःवरच चिडचिड करत मी ऊठले आणि कामाला लागले. बाहेरुन नेहमी येणा-या आवाजात आणखीन एका आवाजाची भर पडल्याचं जाणवलं. त्याला इतर आवाजांना नसणारी एक लय होती. पाऊस? मी जराश्या साशंक मनानीच गॅलरीपाशी गेले. खरोखरच पाऊस! जणू तो थेंबाथेंबातून LA वर असलेला त्याचा हक्क LA च्या मातीला सांगत होता. मी गॅलरीचं दार ऊघडून बाहेर गेले आणि एक खोल श्वास घेतला. परत एकदा ओला रस्ता, ओली छपरं ह्यांच्याकडे पाहुन मला भास होत नाही ना ह्याची खात्री करून घेतली. कधी एकदा माझ्या लाडक्या वळणावरच्या पावसात नाहुन निघालेल्या डोंगरांना बघते असं वाटलं...
एक-दोन तासांनी कामावर जायला गाडी काढली आणि माझ्या ध्यानात आलं की आज तर रात्रपाळी आहे, सूर्य तर कधिच मावळला! आजून दहा तासांनी कामावरून परत येईपर्यंत धीर धरायला हवा त्या वळणावरच्या त्या डोंगरांच्या दर्शनासाठी.